वैद्यकिय सेवेमध्ये आज अनेक क्रांतीकारी बदलांमूळे आयुष्यमानात वाढ झालेली दिसून येते. मात्र त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये नवनवीन व्हायरल/बॅक्टरीअल आजारांची वाढ झालेलीही दिसून येते. लोकांमध्ये आरोग्याबाबतीत जागरुकता वाढल्यामूळेही डॉक्टरांकडे जाण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे सर्वत्र डॉक्टरांच्या/रुग्णालयांच्या संख्येत वाढ होऊनही रुग्णांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येते. वाढती रुग्णसंख्या आणि वैद्यकिय सेवेचे झालेले बाजारीकरण यामूळे वैद्यकिय सेवा अत्यंत महाग झालेल्या आहेत.
कुठल्याही आजारासाठी जनरल प्रॅक्टीशनरकडे गेले असता साधारणत: 60 ते 80 रुपये खर्च येतो. यामूळे बर्याचवेळा ग्रामिण भागामध्ये लहानसहान आजार विनाइलाज अंगावर काढण्याचे वा सेल्फ मेडिकेशन करण्याचे प्रमाण दिसून येते. लहान मुलांच्या तब्येती बारकाईने जपणारे पालक स्वत:च्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करतात. जसजसे वय वाढते तसतसे हे अंगावर काढलेले आजार बळावतात. असह्य गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी यामूळे व्यक्तीची कार्यक्षमताच बर्यापैकी कमी होते. हे त्या व्यक्तीचे, पर्यायाने राष्ट्राचे नुकसानच आहे.
ग्रामस्थांना वैद्यकिय सेवा जर परवडणार्या दरात उपलब्ध करुन दिल्या तर हा प्रश्न बर्यापैकी सुटू शकेल असा विश्वास वाटतो.
सरकारने याबाबतीत अनेक योजना सुरु केल्या आहेत. पण त्या मुख्यत्वे मोठ्या प्रकारच्या आजारासाठी/शस्त्रक्रियांसाठी आहेत. मेडिक्लेम सारख्या योजना रुग्णालयात अॅडमिट झाल्यानंतर लागू होतात. परंतु लहानसहान आजारासाठी अशी एकही योजना कार्यन्वित नाही.
नगरपालिका/महानगरपालिका हद्दींमध्ये त्यांच्या हद्दींमध्ये रुग्णालये चालू केली जातात. जिल्ह्याच्या ठिकाणी राज्य सरकारतर्फे रुग्णालये चालवली जातात. जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्रे चालवली जातात. त्याचे प्रमाण साधारणत: 10 गावांमध्ये एक असे असते. बर्याचवेळा जाण्या-येण्याचे अंतर, त्यासाठी येणार खर्च परवडण्यासारखा नसतो. औषधांचा तुटवडा, सार्वजनिक सुट्ट्या अशा अनेक कारणांनी प्राथमिक आरोग्य केंद्र समाजातील ही त्रुटी भरुन काढू शकत नाही. त्यामूळे संस्थेने हा उपक्रम हाती घेण्याचे ठरवले.